Coronavirus : मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत PM मोदी ! माजी पंतप्रधान, राष्ट्रपतींसह सोनिया आणि ममता यांना केला कॉल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस विरुद्ध सुरु असलेल्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याअंतर्गत मोदींनी रविवारी माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी संवाद साधला. या व्यतिरिक्त ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलले. पीएमओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पंतप्रधानांनी सर्वात पहिले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फोन करून कोरोनाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यानंतर त्यांनी प्रतिभा पाटील यांच्याशीही चर्चा केली. यासोबतच त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवगौडा यांना फोन केला.

विरोधी नेत्यांना लावला फोन
लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून केंद्रावर हल्ला करणाऱ्या कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. याशिवाय समाजवादी पार्टीचे (एसपी) ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव, तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दल (बीजद) सुप्रीमो आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, डीएमके प्रमुख एमके स्टालिन. तसेच तेलंगणाच्या सीएम केसीआरशी फोनवर बोलले. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनाही फोन केला.

मोदी म्हणाले, सूचना असेल तर नक्की सांगा
मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदी यांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत उचललेल्या पावलांविषयी सर्वांना सांगितले आणि कोरोनाशी सामना करण्यासाठी त्यांच्या सूचनाही मागवल्या. गेल्या काही दिवसांपासून या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री, राजकारणी, खेळाडू, रेडिओ जॉकी आणि समाजातील प्रत्येक घटक सतत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. ८ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विरोधी पक्षांच्या नेत्यांशी त्यांची आणखी एक बैठक होणार आहे.