PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार ‘बायोपिक’; जसोदाबेन यांचे पात्रही असणार, ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक यापूर्वी आला होता. त्यानंतर आता त्यांच्या आयुष्यावर नवा बायोपिक येत आहे. ‘इंडिया इन माय वेन्स’ नावाच्या बायोपिकची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष मलिक असणार आहेत.

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक यापूर्वी प्रसिद्ध झाला होता. अभिनेता विवेक ओबेरॉयने प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाचे शूटिंग अहमदाबाद येथे करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नवा बायोपिक येत आहे. त्यामध्ये कॅप्टन राज माथूर हे नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहेत. मात्र, त्यांची पत्नी जसोदाबेन यांची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याची माहिती अद्याप दिली गेली नाही. याशिवाय या सिनेमामध्ये अभिनेता बिंदू दारा सिंह, शाहबाज खान आणि रझा मुरादही असणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाचे शूटिंग हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह अयोध्या येथे केले जाणार आहे.

सुभाष मलिक यांनी 27 वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले आहे. मोदींच्या या बायोपिकमध्ये 2014 नंतरच्या आयुष्यावरील जीवनक्रम दाखवला जाणार आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती यामध्ये दाखवली जाणार आहे. हा सिनेमा 6 महिन्यांमध्ये दाखवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.