देशातील सर्वात मोठ्या रेल्वे-रोड पुलाचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

आसाम : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशातील सर्वात मोठ्या रेल्वे-रोड पुलाचं उद्घाटन केलं आहे. आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील हा पूल आहे. हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडतो. या पुलामुळे चीन सीमेपर्यंतचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अतिशय मोठं आहे. 4.94 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे.

आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वात मोठा रेल्वे-रोड पूल उभारण्यात आला. हा पूल ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण तटाला धेमाजी जिल्ह्याला जोडतो.  पंतप्रधान मोदींनी पुलाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी उत्तरेच्या टोकाच्या दिशेनं प्रवास केला. या पुलावरुन वाहनं आणि ट्रेन एकाचवेळी धावू शकतात. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी 5920 कोटी रुपये खर्च आला आहे. हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार मानला जातो. कारण हा पूल डबलडेकर आहे. . पुलाच्या वरील भागात तीन पदरी रस्ता आहे.

https://twitter.com/ANI/status/1077491271680356352

या पुलाची उभारणी करताना लष्कराच्या गरजांची विशेष काळजी घेण्यात आली. या पुलावरुन लष्कराचे वजनदार रनगाडे सहजपणे जाऊ शकतात. त्याचवेळी खालील भागात रेल्वेचे दोन ट्रॅक आहेत. अरुणाचल प्रदेश सीमेवर अनेकदा चीनकडून घुसखोरी केली जाते. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

या पुलाचा शिलान्यास १९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी घोषणा केली होती. नंतर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बोगीबेल पुलाचे काम प्रत्यक्षात सुरु केले. आता पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवारी) अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मदिनादिवशी याचे उद्घाटन केले.

हा पूल बांधण्यामागचा उद्देश 
भारताच्या संरक्षण विभागाच्या दृष्टीकोनातून हा अत्यंत महत्वाचा पूल आहे. भारत-चीनच्या सीमावर्ती भागात अरुणाचल प्रदेश येथील सैनिकी तळावर अत्याधुनिक शस्त्रसाठे कमी वेळात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही दुमजली उड्डाण पूल उपयुक्त ठरेल. सर्वांत महत्वाचे म्हणजे हा पूल बनवण्यासाठी ब्रह्मपुत्रच्या दक्षिण भागातून इटानगरच्या रस्त्यापर्यंतचे सुमारे १५० किमी अंतर कमी होणार आहे. तर दिब्रुगड आणि अरूणाचल यांच्यादरम्यानचे १०० किमी कमी होईल.