तुम्ही माझ्यावर स्ट्राईक करा, मी दहशतवाद्यांवर स्ट्राईक करतो : मोदींचा विरोधकांना टोला 

गांधीनंगर : वृत्तसंस्था – एअर स्ट्राईक नंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पण अखेर मोदींनी विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. “ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लगावला”. गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचा शुभारंभ करताना नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लक्ष्य केले.
त्यांची मानसिक अवस्थाच गरीब – यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली, ते म्हणाले की, “ज्यांच्यासाठी गरीब फक्त फोटो काढण्यासाठीचा खेळ आहे, ज्यांना गरिबांच्या दुखा:शी काही देणंघेणं नाही त्यांची मानसिक अवस्था गरीब आहे. आमच्यासाठी गरीबी ही मोठे आव्हान आहे. कोणीही कितीही गरीब असो वा अशिक्षित असो या योजनेचा लाभ त्याला सहजरित्या होऊ शकतो. ज्या श्रमिक कामगारांचे वय १८ ते ४० या वयोगटात आहे. त्यांचे मासिक मानधन १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशाही कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गेली ५५ वर्षे गरिबांच्या नावे मते मिळवणाऱ्यांनी देशावर राज्य केले मात्र अशा असंघटीत कामगारांसाठी कोणत्याही योजना लागू करण्याची त्यांची इच्छा नव्हती असा टोला मोदी यांनी काँग्रेसला लगावला.
कामगारांसाठी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी श्रमिक कामगारांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. डिजिटल इंडियामुळे काही मिनिटांतच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल, २०१४ पुर्वी देशभरात ८० हजार सुविधा केंद्र होते मात्र आमचं सरकार आल्यापासून देशभरात ३ लाखांहून अधिक केंद्र उभारली गेली. आता हीच केंद्र श्रमिक कामगारांना उपयोगी पडणार आहेत. असा दावा पंतप्रधानांनी केला.