‘कर्जा’चा डोंगर आणि घरावर ‘छत’ नसलेल्या ‘रिक्षा’ चालकास भेटले PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आपल्या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी तेथील एका रिक्षा चालकाला आपल्याकडे बोलावून त्याची भेट घेतली, तेव्हापासून हा रिक्षा चालक सोशल मीडियावर चर्चेला विषय बनला आहे.

ज्या रिक्षावाल्याला पीएम मोदी भेटले त्याचे नाव मंगल केवट आहे. मंगल केवट यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधान कार्यालयात पाठवली होती, परंतु पंतप्रधान मोदी व्यस्त असल्याने ते लग्नात सहभागी होऊ शकले नाही. पण त्यांनी पत्राद्वारे लग्नाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या.

जेव्हा पंतप्रधान मोदी वाराणसीत पोहोचले तेव्हा त्यांनी डोमरी गावच्या मंगल केवट यांना हस्तकला संकुलात बोलावून घेतले आणि त्यांच्याशी बातचीत केली. एवढेच नाही तर त्यांनी मुलीला आणि जावयाला सोबत न आणल्याचे कारण देखील विचारले आणि त्यांना आशिर्वाद दिले.

पंतप्रधान मोदींनी ज्या मंगल केवट यांची भेट घेतली त्या मंगल केवट यांच्यावर 1 लाख रुपयांचे कर्ज आहे. एवढेच नाही तर त्यांच्या घराचे छत देखील यामुळे तयार झाले नाही कारण त्यांच्याकडे अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी पैसे नव्हते.

ज्या मंगल केवट यांना मोदी भेटले ते पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या डोमरी गावचे आहेत. मंगल केवट त्या निवडक लोकांपैकी आहे ज्यांना स्वत: पीएम मोदींनी सदस्यता अभियानात सदस्यत्व दिले. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर केवट म्हणाले की ते कायम मोदी भक्त राहू इच्छित आहेत. तर पीएम मोदींनी त्यांना देशभक्त सांगितले आणि म्हणाले की अशीच देशाची सेवा करत रहा.

पंतप्रधान मोदींनी केवट यांच्या देशसेवेचे यासाठी कौतूक केले कारण मंगल केवट यांच्या सकाळची सुरुवात गंगा घाटाची स्वच्छता करण्यापासून होते, जे रोज गंगा घाटाची निशुल्क सफाई करतात.