राम लिला मैदानावरुन PM मोदी आज देणार विरोधकांना ‘उत्तर’, जोरदार ‘तयारी’ !

नवी दिल्ली : व्रतसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा, नागरिक नोंदणी या विषयावर संपूर्ण देशभरात विरोधकांचे आंदोलन सुरु आहे. बिहार, उत्तर प्रदेशात हिंसक वळण मिळाले आहे. यावर भाजपाकडून मामुली मतप्रदर्शन होत होते. काही ठिकाणी या कायद्याचे समर्थनही होत होते. मात्र, विरोधकांच्या टिकेला तितकेच जोरदार उत्तर दिले जात नव्हते. त्यामुळे शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढाकार घ्यायची वेळ आली. दिल्लीतील रामलिला मैदानावर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून ही सभा होत आहे. दिल्लीतील १ हजार ७३१ अनाधिकृत कॉलनीमधील घरे अधिकृत करुन त्यांना मालकीहक्क देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याबद्दल धन्यवाद देण्याचा हेतूने ही सभा आयोजित केली आहे.

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. रामलिला मैदानापासून १ किमी अंतरावर असलेल्या दरियागंज भागात शुक्रवारी हिंसाचार झाला होता, हे लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी या सभेसाठी येणाऱ्या सर्वांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सभास्थळी येणाऱ्या सर्व मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

या सभेसाठी निमलष्करी दलाच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. उपायुक्त स्तरावरील २० पोलीस तसेच दिल्ली पोलिसांचे १ हजार जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दिल्लीत प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/