काँग्रेस आमदाराची पंतप्रधान मोदींवर अत्यंत खालच्या पातळीची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसंच नेत्यांची भाषणे आणि त्यातील एकमेकांवरील आरोप वाढत जात असतात. मात्र, हे करत असताना त्यांनाही काही मर्यादा असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी नारायण राव यांची जीभ घसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दाचा वापर करत वादग्रस्त विधान केले आहे. सोमवारी (18 मार्च) कलबुर्गी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत बी नारायण राव बोलत होते.

अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दांचा वापर करत, त्यांचे लग्न लावता येईल पण त्यांच्याकडून पूत्रप्राप्ती होणार नाही’ असं वादग्रस्त वक्तव्य नारायण राव यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी हे काम करणारे पंतप्रधान नाहीत, ते खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली. या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते. मात्र, बी नारायण राव यांचे भाषण राहुल गांधी सभेत येण्यापुर्वीच झाले होते. मात्र राहुल गांधी आल्यावर त्यांनीही मोदींवर जोरदार टीका केली.

स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांची स्वत:ची चोरी पकडली जाताच, आता ते सारे भारतीयच चौकीदार असल्याचे सांगू लागले आहेत. मोदी यांनी स्वत:ला किती वेळातरी चौकीदार म्हणवून घेतले, तरी ते चोर असल्याचे प्रत्येक भारतीयाने ओळखले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसंच पंतप्रधान होताच मोदी यांनी स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेत प्रत्यक्षात मात्र काही ठरावीक श्रीमंतांची चौकीदारी करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी केवळ चोरच नाहीत, तर ते खोटेही बोलतात. दरवर्षी तरुणांसाठी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली, पण तीही खोटी ठरल्याचे भारतीय जनतेने ओळखले आहे, असं सांगत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.