मालदीवमध्ये नरेंद्र मोदींचे धुमधडाक्यात ‘स्वागत’ ; नरेंद्र मोदींना देणार ‘हा’ सर्वोच्च सम्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मालदीवला पोहचले. दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. नरेंद्र मोदी मालदीवच्या संसदेला देखील संबोधित करणार आहेत. या आधीच मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘रूल ऑफ निशान इज्जुद्दीन’ हा सम्मान देण्याची घोषणा केली आहे. हा परदेशी प्रतिनिधींना देण्यात येणारा मालदीवचा सर्वात मोठा नागरी सम्मान आहे. मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यासाठी हा सम्मान दिला जाणार आहे.

मोदींचे ‘नेबर फर्स्ट’ पॉलिसी

मालदीवच्या दौऱ्यावर जाण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हि दुसरी वेळ आहे. या आधी गेल्यावर्षी मालदीवचे राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहण समारंभात नरेंद्र मोदी मालदीवला गेले होते. मोदी सरकारची ‘नेबर फर्स्ट’ म्हणजे शेजारी देशांना प्राधान्य अशी पॉलिसी राहिली आहे. २०१४ च्या वेळी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भुटानचा दौरा केला होता.

रविवारी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी मालदीवचा दौरा संपल्यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जातील. २१ एप्रिलला श्रीलंकेत झालेल्या बॉंबस्फोटानंतर श्रीलंकेत जाणारे नरेंद्र मोदी पहिले विदेशी नेते असतील. नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेतील. श्रीलंकेमध्ये ईस्टरच्या दिवशी झालेल्या बॉंबस्फोटात ११ भारतीयांसह २५८ लोकांचा मृत्यू झाला होता.