राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावे तिकडे मोदीचेच फोटो झळकतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असेच चालत राहिले तर. तर मोदीजी नोटांवरून देखील गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच बंगालमध्ये लसीकरण सुरु झाले आहे. मात्र, लसीकरण प्रमाणपत्रामुळे येथे वाद उभा राहिला होता. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्राकडे टीका केली होती. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने पंतप्रधान मोदीवर टीकास्त्र सोडले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणूक होणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या छायाचित्राला विरोध करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. यावरून मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.