अभिमानास्पद ! PM नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवत असलेल्या अनेक योजनांचा जागतिकपातळीवर डंका वाजला आहे. एवढेच नाही तर अनेकवेळा त्यांचा आंतराष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला आहे. त्यामध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व या पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती आयएचएस मारकिट नं दिली आहे. पुढील आठव़ड्यात एका आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.त्यावेळी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

वातावरण बदलांसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत जॉन केरी, बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि ब्रेक थ्रू एनर्जीचे संस्थापक बिल गेट्स आणि सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासिर हे या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आयएचएस मारकिटचे उपाध्यक्ष आणि कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॅनिअल येर्गिन म्हणाले की,
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भूमिकेविषयी आम्ही पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाकडे पाहत आहोत. देश आणि जगाच्या आगामी काळातील ऊर्जेबाबत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत होत असलेल्या विकासात भारताच्या नेतृत्वाचा विस्तार करण्याच्या आपल्या बांधिलकीसाठी, आम्हाला त्यांना केरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आनंद होत आहे, असं यांनी सांगितलं.

भारत जागतिक उर्जा आणि पर्यावरणाच्या केंद्रस्थानी आला आहे. शाश्वत भविष्यासाठी सार्वत्रिक उर्जा उपलब्धता सुनिश्चित करताना हवामान बदलांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्याचं नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले. वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद ऊर्जा उद्योगातील दिग्गज, तज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि धोरणकर्ते, तंत्रज्ञानाचे नेते, आर्थिक आणि औद्योगिक समुदाय, तसंच ऊर्जा तंत्रज्ञान नवप्रवर्तकांचे एक संमेलन आहे. असेही ते शेवटी म्हणाले.