एका समूहाने माजी पंतप्रधानांना बदनाम केले, आम्ही त्यांचे संग्रहालय उभारणार : पीएम मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक पंतप्रधानांचे योगदान समोर येऊ दिले नाही, माजी पंतप्रधानांचे योगदान सर्वांना कळावे यासाठी आम्ही संग्रहालय उभारणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मोदी बोलत होते. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि रवी दत्त वाजपेयी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव ‘चंद्रशेखर : द लास्ट आइकन ऑफ आइडियोलॉजिकल पॉलिटिक्स’ असे आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपस्थित होते.

मोदी यांनी म्हटले की, एका विशिष्ट समूहाने माजी पंतप्रधानांची प्रतिमा खराब केली आहे. चंद्रशेखर यांना प्रयत्नपूर्वक विसरायचं काम करण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी म्हटले की, कोणत्याही पंतप्रधानांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आता आमचे सरकार सर्व माजी पंतप्रधानांचे संग्रहालय तयार करेल.

माजी पंतप्रधानांच्या योगदानासाठी संग्रहालय

मोदींनी म्हटले की, एका समूहाकडून माजी पंतप्रधानांच्या बदनामीचे काम करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान बैठकीत झोपतात अशी चर्चा पंतप्रधानांविषयी केली जाते. अशा अफवा पसरवून पंतप्रधानांचे योगदानाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. परंतु आता मी निश्चय केलाय की दिल्लीमध्ये सर्व माजी पंतप्रधानांचे संग्रहालय तयार करण्यात येईल. सर्व माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांना मी विनंती करतो की त्यांच्या जीवनातील विविध वस्तू एकत्र करा. या संग्रहालयात चौधरी चरण सिंह, देवगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह सर्व माजी पंतप्रधानांचा या संग्रहालयात समावेश असेल.

 

आरोग्यविषयक वृत्त –