बजेटआधी पंतप्रधान मोदींनी ‘या’ मुद्यांना केलं ‘टार्गेट’ ; जनता होणार ‘खूश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता मंत्रिमंडळाची स्थापना केल्यानंतर मोदींनी आता महत्वाचे आणि लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये देण्यात आलेली सूट देखील मोदी सरकार कायम ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. ५ जुलै रोजी संपूर्ण बजेट सादर करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना यासंबंधी कडक सुचना दिल्या असून मंत्र्यांनी रोजगार, शेतकरी आणि गुंतवणूक यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्या आहेत. यासंबंधीचा प्लॅन तयार असून या बजेटमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांवर लक्ष –

या आर्थिक वर्षात मोदी आणि मंत्रिमंडळाने या बजेटमध्ये शेतकऱ्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. यासाठी या अर्थसंकल्पात ३० टक्के वाढ करण्याचा देखील सरकार विचार करत असल्याचे समजत आहे. मागील बजेटमध्ये यात जवळपास १४४ टक्क्यांची वाढ करून ते १,४०,७६४ लाख करोड़ रुपये इतकी करण्यात आली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १ वर्ष ते ५ वर्ष बिनव्याजी कर्ज देण्याचा देखील विचार करत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना धान्य साठवणुकीला अडचण येऊ नये म्हणून, गावपातळीवर नवीन गोदाम उभे करण्याची देखील योजना आणण्याच्या विचारात आहे.

रोजगारावर लक्ष केंद्रित –

या सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदी सरकारने या आर्थिक वर्षात रोजगार निर्मितीवर देखील भर देण्याचे ठरवले आहे. यासंबंधी सरकार एक समिती स्थापन करणार असून या समितीत १० मंत्र्यांचा समावेश असणार आहे. या समितीत नरेंद्र मोदी स्वतः अध्यक्ष असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शहरी कार्य राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी हे देखील या समितीचे सदस्य असतील. दरम्यान, आता या टर्ममध्ये मोदी सरकार आपला प्लॅन तयार करून विकासाकडे वाटचाल करणार असल्याचे दिसून येत आहे.