पंतप्रधानांनी केली ‘मन कि बात’ तर सोशल मीडियावर तरुणांनी ट्रेंड केले #jobkibaat

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या माध्यमातून देशातील लोकांना संबोधित करत होते. त्याचवेळी देशातील तरुण सोशल मीडियावर ‘जॉब की बात’ हॅशटॅग ट्रेंड करत होते. ट्विटरवर सध्या हा #JobKiBaat पहिल्या नंबरवर ट्रेंड होत आहे. राजस्थानमधील एक तरुण हंसराज मीणाने या बेरोजगार तरुणांचा आवाज उठवण्यासाठी या हॅशटॅगच्या समर्थनार्थ मोहीम राबविली. याचा परिणाम असा झाला कि, जेव्हा पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित झाला तेव्हा ‘मन की बात’ ट्विटरवर चौथ्या क्रमांकावर आणि ‘जॉब की बात’ पहिल्या क्रमांकावर होते.

‘जब युवा करते हैं #JobKiBaat तो उनको सरकार भेज देती है हवालात’ : प्रियंका गांधी
देशभरातील तरुणांकडून #jobkibaat ट्रेंड होत असताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधीने याला पाठबळ दिले. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधीने ट्विट करून केंद्र सरकारवर हल्ला चढविला. प्रियंका म्हणाली कि, ‘हे कसले सरकार आहे? जेव्हा तरुण करतात #JobKiBaat तेव्हा सरकार त्यांना जेलमध्ये पाठवते. तरुण त्यांच्या हक्कांबद्दल बोलतील. तरुणांशी बोलणे आणि त्यांचे ऐकणे हा सरकारचा धर्म आहे. या ट्विटमध्ये प्रियंका गांधींनी एक वृत्तपत्राचे कटिंग शेअर केले आहे,ज्यात प्रयागराजमधील 103 विद्यार्थ्यांनी रोजगार मिळविण्याची मागणी केली असता त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याविषयी बोलले आहे.

दरम्यान, यापूर्वीही ट्विटरवर # modi_job_do ट्रेंड झाले आहे, तरुणांनी सोशल मीडियावर हे हॅशटॅग ट्रेंड केले होते. या माध्यमातून नोकरीच्या मुद्यावर बरेच तरुण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच हे विद्यार्थी आणि तरुण पंतप्रधानांकडून रोजगाराची मागणी करत आहेत. 25 फेब्रुवारी रोजी या हॅशटॅगवर तरुणांनी लाखो ट्विट केले होते.