‘शेतकऱ्यांबद्दल शरद पवारांची भूमिका शंका निर्माण करणारी’, PM मोदींचे शरसंधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी 2005 मध्ये एपीएमसी कायद्यात बदल करण्यासंबंधी केलेलं वक्तव्य वाचून दाखवत नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी सभागृहात सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.

काय म्हणाले PM मोदी ?
सरकारने 2005 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याला (APMC ACT) सुधारणा करण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना आपला कृषी माल थेट विकता येईल, करार पद्धतीने शेती, खासगी बाजार व्यवस्था निर्माण करणं, शेतकरी ते ग्राहक बाजार आणि ई ट्रेडींगची सुविधाही असेल. या एपीएमसी कायद्यातील सुधारित तरतूदीची अंमलबजावणी करण्यासाठी 2007 मध्ये सूचित केले आहे. 24 खासगी बाजारपेठा आधीच तयार झाल्या आहेत. ही बाब गर्वाने कोण सांगत होते ? तर ते युपीएच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार. हे त्यांच म्हणण आहे. आता ते एकदम उलट भाषा बोलत आहेत. यामुळे त्यांची भूमिका शंका निर्माण करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार अशी भाषा का करत आहेत ? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी शरद पवार यांचे आणखी एक उत्तर वाचून दाखवत म्हणाले, शेतकऱ्यांच्या बचावासाठीच एपीएमसीमध्ये बदल केले जात आहेत. शेतकऱ्यांना मंडईचा पर्याय मिळावा, जास्त व्यापारी नोंद झाल्यास स्पर्धा वाढेल आणि मंडईचे जाळं संपेल असं त्यांनी सांगितलं होत. याशिवाय अनेक सरकारी कृषी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. भोजपुरीत एक गोष्ट आहे की, ना खेळणार, ना खेळून देणार असं सांगत नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला.