‘मन की बात’मध्ये PM मोदी लॉकडाऊनवर बोलणार का ? देशभरात ‘उत्सुकता’

नवी दिल्ली : ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहे. यामध्ये पंतप्रधान लॉकडाऊन विषयी काय बोलणार याबद्दल संपूर्ण देशात उत्सुकता आहे. कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेशात वेगाने वाढत आहे. या पाच राज्यात कोरोना बाधितांची संख्या ६५ टक्के इतकी आहे. ३ मे रोजी लॉकडाऊन २ ची मुदत संपत आहे. मात्र, या पाच प्रमुख राज्यातील कोरोना बाधितांची संख्या येत्या ८ दिवसात कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लॉकडाऊनची मुदत वाढविण्यावरही बंधने आहेत.

‘मन की बात’   मध्ये पंतप्रधान मोदी देशवासियांना सहकार्य करण्याचे पुन्हा एकदा आवाहन करतील. त्यामुळे आणखी काही दिवस लोकांनी हा लढा असाच निकराने लढवावा असे जनतेला सांगण्याची शक्यता आहे.दर महिन्यांच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील जनतेशी संवाद साधत असतात. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ‘मन की बात’ हा उपक्रम सुरु केला आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा महिना वगळता आतापर्यंत हा उपक्रम नियमितपणे सुरु आहे.