PM मोदी आज ‘संपत्ती कार्ड’ योजनेची सुरुवात करणार, महाराष्ट्रातील 100 गावांचा समावेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ आज रविवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या योजनेत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचे कार्ड देण्यात येणार आहे, या कार्डद्वारे बँकेतून कर्ज घेणे, तसेच अन्य कामे करणे सोपी होऊ शकतात.

स्वामित्व योजनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले असून यामध्ये म्हटले आहे की, रविवारचा दिवस ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.

काय आहे योजना

1 या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या संपत्तीचा उपयोग आर्थिक गोष्टींसाठी करण्यासाठी एक कार्ड दिले जाईल.

2 या कार्डाचा इतर योजनांसाठीही फायदा होणार आहे.

3 सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 1 लाख नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर संपत्ती कार्डची लिंक दिली जाईल. येथून हे कार्ड त्यांना डाऊनलोड करता येईल. नंतर प्रत्यक्ष कार्ड दिले जाईल.

4 विविध राज्यातील 763 गावांना याचा फायदा होणार आहे.

5 महाराष्ट्रातील 100, उत्तर प्रदेश 346, हरियाणा 221, मध्य प्रदेश 44, उत्तराखंड 50 आणि कर्नाटकातील 2 गावांचा यामध्ये समावेश आहे.

6 महाराष्ट्र वगळून इतर सर्व राज्यांमध्ये एका दिवसात कार्ड दिले जाईल. महाराष्ट्रात या कार्डसाठी काही शुल्क घेतले जाणार असल्याने त्याला 1 महिना लागणार असल्याचे म्हटले जात आहे.