Covid-19 : PM मोदी आज पुणे-हैद्राबाद आणि अहमदाबादमध्ये वॅक्सीन सेंटरचा करणार दौरा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना वॅक्सीनवर सतत लक्ष ठेवून आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी पुणे, अहमदाबाद आणि हैद्राबादचा दौरा करणार आहेत. या तिनही ठिकाणी कोरोना वॅक्सीनचे काम सुरू आहे. पीएम मोदी या दरम्यान वॅक्सीनशी संबंधीत माहिती घेतील.

पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, पीएम मोदी आज तीन कोरोना वॅक्सीन सेंटरचा दौरा करतील. पीएम शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून वॅक्सीनची तयारी, समोर येणारी आव्हाने आणि प्रयत्नांचे नियोजन करण्याबाबत माहिती घेतील.

पीएम मोदी यांच्या दौर्‍याबाबत पीएमओने एक ट्विट सुद्धा केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क, हैद्राबादमध्ये भारत बायोटेक आणि पुणे येथे सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया येथे भेट देतील. याच तीन सेंटरवर कोरोना व्हायरसची वॅक्सीन डेव्हलप केली जात आहे. यापैकी सीरम इन्स्टीट्यूटची वॅक्सीन फेब्रुवारी 2021 पर्यंत मार्केटमध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे.

मात्र, पीएम मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकी स्पष्ट सांगितले होते की, वॅक्सीन केव्हा येईल, याबाबत स्पष्टपणे काही सांगता येणार नाही. शास्त्रज्ञ वेगाने यावर काम करत आहेत.

पीएम मोदी यांच्या अहमदाबाद दौर्‍याबाबत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पीएम मोदी अहमदाबादची औषध कंपनी झायडस कॅडिलाचा दौरा करतील आणि येथे तयार होत असलेल्या कोरोना वॅक्सीनशी संबंधीत माहिती घेतील. औषध कंपनी झायडस कॅडिला अहमदाबादच्या जवळ चांगोदर औद्योगिक क्षेत्रात आहे. औषध बनवणार्‍या कंपनीने अगोदरच घोषणा केली होती की, कोविड-19 ची संभाव्य लसीने पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू केली होती.