PM Modi Visit To Pune | Pune Metro चे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; नरेंद्र मोदी म्हणाले – ‘पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार’

पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून त्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. (PM Modi Visit To Pune)

 

एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे आदी उपस्थित होते. (PM Modi Visit To Pune)

 

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतूकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल.

नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा
देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतूकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.

आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेट्रो प्रवासामुळे शहराला मदत होईल, असेही ते म्हणाले.

शहराला आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर बनवावे लागेल
एकविसाव्या शतकात शहरांना अधिक आधुनिक बनवावे लागेल आणि नव्या सुविधांचे निर्माणही करावे लागेल. भविष्यातील शहरांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. प्रत्येक शहरात पर्यावरण अनुकूल वाहतूकीला आणि त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व सुविधांना आधुनिक बनविणारे एकात्मिक नियंत्रण केंद्र असावे. शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धत आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजचे आहे. जलस्त्रोतांच्या आणि ऊर्जेच्या पूर्ण कार्यक्षम उपयोगावर भर देणेही आवश्यक आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

 

पर्यावरणपूरक इंधनाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख
शहरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न होत आहे. पुण्याची ओळख ‘ग्रीन फ्युएल सेंटर’ म्हणून होत आहे. प्रदूषणपासून मुक्ती, कच्च्या इंधनाच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इथेनॉल आणि जैविक इंधनावर भर देण्यात येत आहे. पुण्यात इथेनॉल ब्रँडीगशी निगडीत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 

वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा
पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. पूर नियंत्रणासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. मुळा – मुठा नदीची स्वच्छता आणि सुशोभिकरणासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. नद्या पुनरुज्जिवीत झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. नदीच्या प्रती श्रद्धा, पर्यावरण विषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांनी नद्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.

पुणे महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होणारी विकासकामे इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या आणि शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या आहेत. पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ते म्हणाले, पुणे ही रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांची भूमी आहे. जिजाऊ मासाहेबांची सोन्याचा नांगर चालवून पुण्याच्या पुनर्निर्माणाचा शुभारंभ केला होता. राष्ट्रनिर्मितीचा आणि जनसेवेचा हा वारसा पुढे नेण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे.

 

पुणे मेट्रोसाठी जनतेला धन्यवाद
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पुण्याच्या जनतेने अडचणी सहन केल्या आहेत. १२ किलोमीटर मार्गावर ही मेट्रो रेल्वे धावणार आहे.
पिंपरी – चिंचवड ते स्वारगेट विस्तारीकरणाबरोबरच पिंपरी – चिंचवड ते निगडी कॅरीडोर, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोड मार्गिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा काम चालू आहे.
या प्रकल्पांसाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर टप्पा २ च्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे,
असे आवाहन त्यांनी केले.

Advt.

विकासासाठी पर्यावरणाचा विचार करावा लागेल
मुळा – मुठा नदी सुशोभिकरण आणि जायका प्रकल्प शहरासाठी महत्वाचे आहेत.
पुण्यात साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर मुळा – मुठा नदी सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे.
नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि जैवविविधतेला धक्का न लावता ही कामे करावी लागतील.
पूर नियंत्रण रेषेचा विचारही होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येईल.

 

इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी करण्याचा विचार व्हावा

शासनाने पर्यावरण रक्षणासाठी ई – वाहन धोरण स्विकारले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण रक्षणाला मदत होईल. सायकलचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वाहनांच्या किंमती कमी करण्याबाबत विचार व्हावा, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील विचार व्यक्त केले.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वागतपर भाषणात पुणे शहरातील विविध प्रकल्पांची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती देऊन प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले.
उषा लक्ष्मण यांनी आर. के. लक्ष्मण यांची पुस्तके प्रधानमंत्री मोदी यांना भेट दिली.

 

पुण्यातील वाहतूक गतिमान करणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या १२ किमी मार्गिकेचे उदघाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किलोमीटर मार्गिकेचे उदघाटन करण्यात आले.
त्यांनी गरवारे मेट्रो स्थानक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रदर्शनाचेही उदघाटन केले.
त्यानंतर त्यांनी आनंदनगर मेट्रो स्थानाकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत संयुक्तपणे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी होत असून पहिल्या टप्यात पुणे येथील गरवारे ते वनाज आणि पिंपरी चिंचवड येथील पीसीएमसी ते फुगेवाडी असा एकूण १२ किलोमीटर मार्ग सुरू करण्यात येत आहे.
या मार्गावर एकूण १० स्थानके आहेत.

 

विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी, १४० ई – बस आणि बाणेर येथील ई – बस डेपोचेही लोकार्पण आणि मुळा – मुठा नदी पुनरुज्जीवन आणि मुळा – मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
मुळा – मुठा नदीच्या ९ किलोमीटरच्या पट्ट्यात नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल.
मुळा – मुठा नदीचे प्रदूषण कमी करणाऱ्या प्रकल्पांतर्गत एकूण ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील,
त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४०० एमएलडी असेल.

 

Web Title :- PM Modi Visit To Pune | PM Modi inaugurates Pune Metro Narendra Modi says Central
government will cooperate for Pune development project

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा