अम्फानमुळं बंगालमध्ये हाहाकार ! दौर्‍यानंतर PM मोदींनी केली 1000 कोटीच्या पॅकेजची घोषणा

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ अम्फानमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या २८३ वर्षातील हे सर्वात भयंकर वादळ आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानंतर पीएम मोदींनी पश्चिम बंगालसाठी १००० कोटी रुपयांची प्राथमिक मदत जाहीर केली आहे, याशिवाय लवकरच केंद्राची एक टीम राज्यात येऊन सविस्तर सर्वेक्षण करेल.

हवाई सर्वेक्षणानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात कोरोना विषाणूचे संकट आहे, तेव्हाच पूर्व भागात वादळाचा परिणाम झाला. या वादळासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तयारी केली होती, पण तरीही आम्ही ८० लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले.

पीएम मोदींनी १००० कोटी रुपयांची प्राथमिक आर्थिक मदत जाहीर केली आहे, तसेच मृतांच्या कुटुंबासाठी भरपाईची घोषणा केली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली असून जखमींना ५० हजार रुपये मदत दिली जाईल.

शुक्रवारी सकाळपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळामुळे ८० लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याला सुमारे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

कोरोना संकटादरम्यान पीएम मोदी ८३ दिवसानंतर प्रथमच दिल्लीबाहेर दौर्‍यावर आहेत. देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन २५ मार्चला लागू करण्यात आला.

त्यानंतर पीएम मोदींनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, पण दिल्लीबाहेर गेले नाहीत. लॉकडाऊनच्या काही दिवस आधी मोदींनी दिल्लीबाहेर कोणताही दौरा केला नव्हता. अशा परिस्थितीत हा दौरा ८३ दिवसानंतर होत आहे.

ओडिसाचाही दौरा करणार पीएम मोदी
अम्फान वादळामुळे ओडिसामध्येही नुकसान झाले आहे. मात्र, बंगालच्या तुलनेत तिथे कमी नुकसान झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटनुसार, पीएम मोदी ओडिसामध्ये झालेल्या नुकसानीचे देखील हवाई सर्वेक्षणही करतील.

ममता यांनी केले होते पीएम मोदींना आवाहन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदे दरम्यान पंतप्रधान मोदींना राज्याचा दौरा करण्याचे आवाहन केले होते. काही तासानंतरच मुख्यमंत्री ममता यांचे आवाहन स्वीकारत पंतप्रधान मोदींच्या दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुरुवारी पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे राज्याचा दौरा करण्याची मागणी केली होती. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यातील परिस्थिती ठीक नाही. पंतप्रधान मोदींनी येथील दौरा करावा अशी माझी मागणी आहे. मी देखील हवाई सर्वेक्षण करेल. पण मी परिस्थिती ठीक होण्याची वाट पाहत आहे.

कोलकातामध्ये नुकसान
वादळामुळे कोलकातामधील अनेक भागात पाणी जमा झाले आहे. कोलकाता विमानतळावरही या वादळाचा परिणाम दिसून येत आहे. इथे सर्वत्र पाणी जमा झाले आहे. ६ तासांचे वादळ अम्फानने कोलकाता विमानतळाचे नुकसान केले. सगळीकडे पाणी जमा झाले आहे. रनवे आणि हॅंगर्स पाण्यात बुडाले आहेत. विमानतळाच्या एका भागात बर्‍याच इन्फ्रास्ट्रक्चर पाण्यात बुडून गेल्या आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना, दक्षिण २४ परगना, मिदनापूर आणि कोलकातामध्ये अम्फानचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.