…म्हणून PM मोदींच्या सख्खया पुतणीला गुजरात भाजपानं नाकारलं तिकीट

अहमदाबाद: पोलिसनामा ऑनलाईन – अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून गुरुवारी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी भाजपने जाहीर केली. मात्र या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांच्या नावाचा समावेश नसल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी सोनल मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर सामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून सोनल मोदी यांनी भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. गुरुवारी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली मात्र कोणत्याही वॉर्डातून सोनल मोदी यांचे नाव नव्हते. मला तिकीट नाकारलं तरी मी एक समर्पित कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये सक्रिय राहील असं सोनल मोदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सोनल मोदी या नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहेत. प्रल्हाद मोदी यांचं किराणा मालाचं दुकान असून ते गुजरात फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या संसदीय मंडळाने काही नियम जारी केले आहे. या नियमानुसार ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांनी नगरसेवक म्हणून तीन वेळा काम केले आहे अशांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका) निवडणुकीसाठी निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले जाणार नाही. गुजरातमध्ये ६ महापालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

सर्वांसाठी नियम सारखाच : भाजप प्रदेशाध्यक्ष
गुजरात भाजपाने पक्षातील नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा निर्णय या आठवड्याच्या सुरूवातीलाच घेतला होता. दरम्यान सोनल मोदी यांना तिकीट नाकरल्यानंतर याबाबत भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना विचारलं असता, सर्वांसाठी नियम सारखेच आहेत असं ते म्हणाले.