पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेल्या ‘या’ शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी घेण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यात उशीर झाल्याने सोमवारी रात्री पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या पाच शेतकऱ्यांमधील ४२ वर्षीय मुरलीधर राउत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन कि बात’ या कार्यक्रमात कौतुक केले होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदी वेळी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले होते.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेलार गावामध्ये राहणाऱ्या मुरलीधर राउत यांचे कौतुक करताना मोदींनी म्हटले होते कि, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची आणि आरोग्याची त्यांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेतली होती. नोटबंदी झाल्यानंतर ज्यांच्याजवळ रोख रक्कम नसेल अशा नागरिकांना ते त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण देत असत त्यानंतर परत कधीही आल्यानंतर ते लोकं त्यांना पैसे परत देत असत.

या घटनेविषयी सांगताना एका अधिकाऱ्याने सांगितले कि, ज्या जागेवर मुरलीधर राउत यांचे हॉटेल होते ते राज्यमहामार्ग चौपदरीकरणामध्ये जात आहे. त्यामुळे राऊत यांनी चार शेतकऱ्यांसह अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या सर्व शेतकऱ्यांवर अकोल्यामधील दवाखान्यात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

आरोग्यविषयक वृत्त