बहुमताचे सरकार पुन्हा जिंकून सत्तेत येईल : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले तसेच पूर्ण बहुमताचे सरकार पाच वर्षे पूर्ण करून दुसऱ्यांदा जिंकून सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आपली लोकशाही विविधतेनं भरलेली आहे. जगाला प्रभावित करणाऱ्या अनेक गोष्टी भारतात आहेत. आपल्या देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळं एकत्ररित्या सुरू आहे. ‘

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे. पाच वर्षांत मी भरीव काम केलं. अनेक चढ-उतार आले, पण प्रत्येकवेळी देशानं साथ दिली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या देशाचे आभार मानले. माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता हेच मी मानतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अध्यक्षजी जवाब देंगे
त्यानंतर पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला असता “अध्यक्षजी जवाब देंगे” असं म्हणत मोदींनी उत्तर देण्याचं टाळलं.