‘कोरोना’मुळे जगाने योगाला गांभीर्याने घेतले : PM नरेंद्र मोदी

पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोनाचे संकट ओढवलेले असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्याने घेत आहे. योगामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनते. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचे भाग बनवावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

मोदी म्हणाले, योग दिन हा एकात्मतेचा दिवस आहे. जो आपाल्याला जोडतो. सोबत आणतो तोच तर योग आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग हे दाखवून देतो की, लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचे ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे.

प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसने आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात, असे मोदी म्हणाले. कोरोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसने श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे प्रत्येकाने प्राणायमाचा दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावे. कोरोना झालेल्या लोकांनाही यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.