‘काही Video आणि Photo पाहून असं दिसतंय की…’, PM मोदींनी व्यक्त केली चिंता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशावर ओढवलेल्या आणि घोंघावत असलेल्या संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार दि 20 ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी देशातील परिस्थितीविषयी भाष्य केलं. आता देश हळूहळू अनलॉक (Unlock) होत आहे. सर्व काही पूर्वपदावर येत आहे. अशात काही नागरिक बेफिकिर होत कोरोनाबाबतच्या (Corona) खबरदारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

‘काही व्हिडीओ आणि फोटो पाहून असं दिसतंय की…’

पीएम मोदी म्हणाले, “कोरोना विरोधातील लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळं आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा. व्हायरस वाढू नये यासाठी काळजी घ्यावी लागेल. काही व्हिडीओ आणि फोटो पाहून असं दिसतंय की, लोकांनी खबरदारी घेणं सोडलं आहे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही आपल्या कुटुंबाला संकटात टाकत आहात हेही लक्षात घ्यायला हवं.”

‘आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट’

मोदी म्हणाले, “कोरोना संकटाशी आपण चांगला लढा दिला आहे. सणावारांचे दिवस आहेत. बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाऊन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरू नका. आपली स्थिती सावरली आहे. ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.”

‘लस येत नाही तोवर कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचं’

पीएम मोदी म्हणाले, “लस (Corona Vaccine) येत नाही तोवर कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचं आहे. लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयांपर्यंत कशी पोहोचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरू आहे. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे.” असंही त्यांनी सांगितलं.