21 व्या शतकातील नव्या भारताचा पाया रचणं हे शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची शिक्षण व्यवस्था आपल्या वर्तमान आणि येणाऱ्या पिढ्यांना भविष्यासाठी तयार करत असते. 21 व्या शतकातील नव्या भारताचा पाया रचण्याचं काम हे नवं शिक्षण धोरण करणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नुकत्याच संमत झालेल्या नव्या शिक्षण धोरणावर आपलं मत मांडलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तीन चार वर्षे चाललेल्या वैचारिक मंथनानंतर नव्या शैक्षणिक धोरणाला मंजूरी देण्यात आली आहे. आज प्रत्येक विचारसरणीचे लोक यावर चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे या शैक्षणिक धोरणाला कुणीही विरोध केला नाही. कारण यात काहीही एकतर्फी नाही आहे. आता एवढ्या मोठ्या सुधारणेला वास्तवात कसे आणायचे याचा विचार सर्वजण करत आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जे काही करायचे आहे ते लवकरात लवकर केले जाईल. हे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी जी मदत हवी असेल ती केली जाईल. मी तुमच्यासोबत आहे. शैक्षणिक धोरणांमध्ये देशाच्या लक्ष्यांना विचारात घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यातील पिढी तयार करता येईल. हे शैक्षणिक धोरण नव्या भारताची पायाभरणी करेल. भारताला शक्तीशाली बनवण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.