तरुणांनो नवे स्कील आत्मसात करा, हीच काळाची गरज : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरलच्या संकट काळामध्ये नोकऱ्यांचे स्वरुप बदलत आहे. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तरुणांनी प्रत्येक दिवशी नवे स्कील शिकणे गरजेचे आहे. आजच्या काळात स्कील, रि-स्कील आणि अपस्कील असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला बदलणे गरजेचे असून हीच आता काळाची गरज आहे. जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त मोदी यांनी देशातील तरुणांना संबोधित केले.

पंतप्रधान म्हणाले, आजचा दिवस 21 व्या शतकातील तरुणांना समर्पित आहे. आजच्या युगात स्कील (कौशल्य) सर्वात मोठी ताकद आहे. बदलत्या युगात स्कीलही बदलले आहे. आज आपल्या देशातील तरुण अनेक नवनवीन गोष्टी शिकत आहे, आत्मसात करत आहे. ही छोटी-छोटी स्कील आत्मनिर्भर भारताची शक्ती बनले, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्कील आत्मसात केले तर जीवनात उत्साह निर्माण होईल कोणीही कोणत्या वयात स्कील शिकू शकतो. कोणामध्येही आपली एक प्रकारची क्षमता असते. जे दुसऱ्यांपेक्षा वेगळे आपल्याला बनवते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटात लोक विचारत आहेत, की आजच्या या युगात पुढे कसे जाता येईल. त्याचा मंत्र आहे, आपल्याला स्कील मजबूत बनविणे गरजेचे आहे. आता आपल्याला नव्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे. यशस्वी व्यक्तीला आपले स्किल सूधारण्याची संधी शिकायला हवी. नव्या स्कीलनुसार बदल आत्मसात करणे गरजेचे आहे, ही आता काळाची गरज आहे. मोदी पुढे म्हणाले की, जर तुम्ही व्हिडीओ पाहून सायकल चालवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे फक्त ज्ञान तुम्हाला मिळेल. पण प्रत्यक्षात तुम्ही सायकल चालवायची असेल तर तुमच्याकडे स्कील असणे गरजेचे आहे.