PM मोदींची घोषणा : बचत गटाच्या महिलांना 1 लाखाचं कर्ज देणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये पंतप्रधानच्या उपस्थितीत महिला बचत गटांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांची प्रशंसा केली. तसेच बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत एक लाखाचं कर्ज देण्यात येईल अशी घोषणा मोदींनी केली.

मोदी म्हणाले की, ‘बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत एक लाखाचं कर्ज देण्यात येईल. तसेच जनधन खातं असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरी 5 हजार रुपयांचं कर्ज देण्यात येईल. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. देशाच्या ओद्योगिक गतीचे नवकेंद्र हे औरंगाबाद होत असून येणाऱ्या काळात येथे अनेक उद्योग सुरु होतील. याच्या माध्यमातून मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.’

ऑरिक हॉल, कमांड कंट्रोल सेंटर, रोड सिस्टिम नेटवर्क, लॅण्ड सिस्टम आणि अ‍ॅमेनिटीजचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातल्या दिग्गज नेते उपस्थित होते. तसेच महिला बचत गटाचा मेळावाही पार पडला. प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला बचत गटाच्या मेळाव्याला जवळपास 1 लाख महिलांची उपस्थिती होती.