PM मोदींच्या सांगण्यावरून सुद्धा मंत्री राजीनामा देत असतील तर, नक्कीच काहीतरी गडबड आहे : संजय राऊत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विरोधी पक्षाकडून सातत्याने कृषीविषयक विधेयकांना विरोध करण्यात येत आहे. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( NDA ) काही घटक पक्षांचाही या कृषीविषयक विधेयकांना विरोध करण्यात येत होता. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाकडून कृषीविषयक विधेयकांचा निषेध करण्यात आला. अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर यांनी गुरुवारी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता शिवसेनेकडूनही केंद्रातील मोदी सरकारला कृषीविषयक विधेयकांच्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधान सांगत असतील आणि तरीही तुमचा मंत्री राजीनामा देत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सर्वांना सोबत घेण्यात यावं
एनडीएच्या खोट्या राजकारणामुळे आम्हाला त्यांची साथ सोडण्यास भाग पाडल आहे. आम्ही दोघेही सर्वात जुने सहकारी होतो. बाकीचे पाहुणे आहेत, असं संजय राऊत म्हणाले.आधी शिवसेनेने आणि आता शिरोमणी अकाली दलाने एनडीएची साथ सोडली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सगळ्यांना सोबत घेतले पाहिजे. आता एनडीएचं काही अस्तित्त्वातच नाही असं वाटत आहे. आजही आम्ही आणि अकाली दल सोबत आहोत, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर हल्ला केला आहे. कृषीविषयक विधेयकांवरून आता सर्वांसोबत चर्चा केली जात आहे. ही गोष्ट याअगोदरच करायला पाहिजे होती. या मुद्द्यावर आम्ही शरद पवारांशी चर्चा करू. कॉंग्रेस आणि सर्वजण एकत्रितपणे निर्णय घेऊ, असं संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मग हरिश्चंद्र कोण ?
पंजाबमधील शेतकऱ्यांकडून कृषीविषय विधेयकांवरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या मुद्यांवर सुद्धा संजय राऊत यांनी टिपण्णी केली आहे. या विधेयकामुळे पंजाबमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र पंजाबसोबत आहे. पंजाबनंतर आता हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची निदर्शनं सुरू होतील असे राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आम्ही खोटं बोलत होतो. शिरोमणी अकाली दल खोटं बोलत असेल तर मग हरिश्चंद्र कोण आहे? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.