नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पियुष गोयल यांनी ट्विटरवरील नावात ‘हा’ केला बदल

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावात मोठा बदल केला आहे. मोदींनी ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असं नाव त्यांच्या ट्विटर अकाऊंटच ठेवल आहे. तर अमित शहा, पियुष गोयल आणि इतरांनी त्यांच्या नावाआधी ‘चौकीदार’ असे लिहिले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर त्याला प्रत्युत्‍तर देत भाजपने ‘मै भी चौकीदार’ म्हणत एक व्हिडीओ तयार केला. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडीओ ट्विटरवर आणि इतर समाज माध्यमांवर शेअर केला. त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. लाखोंनी त्याला लाइक देखील केलं. त्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या टीमकडून त्याला प्रत्युत्‍तर देण्यात आलं. ‘मै भी चौकीदार’ म्हणत पंतप्रधान मोदींसह, नीरव मोदी, विजय माल्ल्याचा फोटो ट्विट करण्यात आला.

राफेल करारावरून राहुल यांनी ‘चौकीदार चोर है’ असा आरोप पंतप्रधान मोदींवर केला होता. त्याला भाजपकडून व्हिडीओव्दारे उत्‍तर देण्यात आले. लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असुन सत्‍ताधारी आणि विरोधांमध्ये आरोप-प्रत्यारोप मोठया प्रमाणावर होत आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींसह अमित शहा, पियुष गोयल आणि इतरांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाऊंटच नाव बदलल आहे.