Coronavirus : आप-आपल्या लोकांना ‘कोरोना’विरुद्ध च्या लढाईत मदत करण्यास समजवा, PM मोदींचे धर्मगुरूंना ‘आवाहन’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या दरम्यान ते म्हणाले, आपला धर्म, विचारधारा, पंथ वाचवण्या अगोदर कोरोनाला पराभूत करावे लागेल. आज सर्व धर्म,पंथ आणि विचारसरणीचे लोकांनी एकत्र येऊन करोना विषाणूचा पराभव करण्याची गरज आहे. जिल्हा पातळीवर सर्व धर्माच्या धर्मगुरुंची बैठक घेऊन त्यांना आपल्या लोकांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहकार्य करण्यासाठी सांगण्यात यावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले की, सर्व धर्माच्या प्रमुख गुरु व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे. त्यांच्या या सुचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरुंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी उपययोजनांसह यासंदर्भातील अनेक मुद्यावर गुरुवारी चर्चा केली. त्यांनी देशातील राज्यातील मुख्यमंत्र्यांना सांगितले की, येत्या काही आठवड्यात प्रत्येकाने कोरोना विषाणू संबंधित संशोधनावर, संक्रमित लोकांचा शोध, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यावर लक्ष्य केंद्रीत करावे.

पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले की, लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्प्याटप्याने लोक, वसाहती भाग सुरु होतील हे पहावे. देशात आतापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे संकट टळले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टनसिंग किंवा सामाजिक अंतर राखायचे आहे. त्यासाठी मास्क वापरले पाहिजे किंवा घरगुती स्वच्छ कपड्याचा मास्क म्हणून उपयोग केला पाहिजे. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.