PM नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन, ‘चला 15 ऑगस्टला शपथ घेऊ की,..’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी देशात कोरोनाविरोधात सुरु असलेल्या लढाईची सद्यस्थिती मांडली. तसेच कोरोनाविरोधात लढताना घ्यावयाच्या खबरदारी विषयीही देशवासियांना सल्ला दिला. मन की बात कार्यक्रमातून त्यांनी कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचं स्मरण केलं. यावेळी त्यांनी येत्या 15 ऑगस्टला एक शपथ घेण्याचे आवाहन भारतीयांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पुढच्या वेळी ज्यावेळी आपण मन की बात मध्ये भेटू त्याच्या आधीच 15 ऑगस्ट येणार आहे. यावेळी वेगळ्या परिस्थितीत 15 ऑगस्ट साजरा होणार आहे. कोरोना माहामारीच्या संकटामध्ये होणार आहे.

माझं देशवासीयांना आवाहन आहे की, आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर भारताचा संकल्प करा. काही नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा संकल्प करा. आपला देश आज ज्या उंचीवर आहे, तो अनेक महान नेत्यांच्या तपश्चर्येमुळे आहे. ज्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांच्यापैकी एक आहेत लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांची 1 ऑगस्टला शंभरावी पुण्यतिथी आहे. त्याचे जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे, असं ते म्हणाले. आज मन की बात च्या 67 व्या भागात देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना कारगिलमधील योद्ध्यांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत दशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा समीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढलं पाहिजे. तसेच त्यांचा सन्मान वाढला पाहिजे. कधीकधी आम्ही एखादी गोष्ट समजून घेतल्याशिवाय सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर करतो. ज्यामुळे आपल्या देशाचे खूप नुकसान होते. कधीकधी ही बाब चुकीची आहे हे माहिती असून देखील केवळ कुतुहल म्हणून फॉरवर्ड केली जाते, अशी नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून बोलू दाखवली.