PM मोदींनी केलं Maharashtra चं तोंडभरून कौतुक, म्हणाले – ‘कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी महाराष्ट्र चांगली लढाई लढतोय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ठाकरे सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी नरेंद्र यांनी शनिवारी (दि. 8) कोरोना विरोधातील लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे, अशा शब्दात कौतुक केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली. तसेच विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करत आहोत, याची माहिती दिली.

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाकडे केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ राज्याला मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच राज्याला विदेशातून लस आयात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीकडे केली आहे.