मोदींच्या बायोपिकला ‘U’ सर्टिफिकेट ; अखेर चित्रपट उद्या होणार रिलीज

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक वादविवादांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट उद्या ११ एप्रिलला रिलीज होत आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली असून या चित्रपटाला ‘यू’ सर्टिफिकेट मिळालं आहे.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वी दोनदा बदलण्यात आली होती. या चित्रपटावर आक्षेप घेत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावताना या चित्रपटाबाबत निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं काल म्हंटलं होतं. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, ‘या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे हा चित्रपट आचार संहितेचा भंग करतो की नाही तसेच प्रदर्शनावर निर्णय निवडणूक आयोगाने घेणं योग्य ठरेल. ‘

उद्या हा चित्रपट रिलीज होत आहे याविषयी विवेक ओबेरॉयने ट्विट केले आहे. ‘तुमचे आशीर्वाद, पाठिंबा आणि प्रेम यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो. तुमचे विनम्र आभार. लोकशाहीवरील विश्वास दृढ केल्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार. गुरुवार, 11 एप्रिल. जय हिंद.’ असं ट्वीटमध्ये विवेक ओबेरॉयने म्हणाला आहे. विशेष म्हणजे #PMNarendraModiWins असा हॅशटॅगही त्याने जोडला आहे.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहे. ओमांग कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’, ‘भूमी’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट १३० मिनिटं (दोन तास दहा मिनिटं ५३ सेकंद) लांबीचा आहे. २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा ‘पीएम नरेंद्र मोदी’ पहिला चित्रपट ठरणार आहे.