‘या’ तारखेनंतर प्रदर्शित होणार PM नरेंद्र मोदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून प्रदर्शनाच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. हा सिनेमा आचारसंहितेच्या काळात प्रदर्शित होणार होता. त्यामुळे विविध पक्षांनी यावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या मुद्द्यावरून निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च या निवडणुकीच्या काळात मात्र या सिनेमाचे प्रदर्शन थांबवले आहे.

या सिनेमामुळे ठराविक एका पक्षाला आणि व्यक्तीला अनुकूल असे वातावरण तयार होत आहे असे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे. तर याबाबत निर्णय देताना, हा सिनेमा निवडणूका झाल्यानंतरच म्हणजेच 19 मेनंतरच प्रदर्शित करण्यात येईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याआधी निवडणूक आयोगाने हा सिनेमा पहावा आणि त्यांचा जो अहवाल आहे त्यावर निर्णय देण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले होते. यानंतर निवडणूक आयोगाने आपला 20 पानी अहवालही सादर केला होता.

चित्रपटातील अनेक दृश्ये ही विरोधी पक्षाला अत्यंत भ्रष्ट दाखवणारी आणि त्यांच्या विरोधी प्रचार करणारी आहेत. त्या नेत्यांची नावे घेतली जात नसली तरी चेहऱ्याच्या साधर्म्यामुळे प्रेक्षक त्यांना सहजच ओळखू शकतात असे मत निवडणूक आयोगाच्या अहवालात मांडण्यात आले होते.