PM मोदींचा मनमोहन सिंग यांच्यावर ‘घणाघात’, म्हणाले – ‘काही लोकांना भारत माता की जय म्हणण्यात अडचण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या सत्राच्या दुसऱ्या भागाची सुरुवात गदारोळाने झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला आणि पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर हल्ला चढविला. दरम्यान, मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या खासदारांना संबोधित केले. ते म्हणाले की पक्षाच्या हितापेक्षा देश मोठा आहे आणि मी जर भारत माता की जय म्हणालो तर प्रश्न उपस्थित केला जातो. आपल्याला देशाच्या हितासाठी संघर्ष करावा लागेल. आपण राष्ट्रीय हित केंद्रस्थानी ठेऊन पक्षाचे हित मागे ठेवले पाहिजे, असे ही ते म्हणाले.

मनमोहन सिंग यांच्यावर पलटवार

दरम्यान पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्यावर पलटवार केला. मोदी म्हणाले की मनमोहन सिंग यांना भारत माता की जय म्हणायला सुद्धा संकोच वाटत होता. स्वातंत्र्याच्या वेळी याच काँग्रेसमधील काही लोक ‘वंदे मातरम’ म्हणण्याच्या विरोधात होते आणि आता यांना ‘भारत माता की जय’ बोलण्यात अडथळा निर्माण होत आहे.

पक्षाच्या हितापेक्षा देशाचे हित अधिक महत्वाचे

मोदी म्हणाले, आम्ही देशहिताचे काम करत आहोत, तसेच ते म्हणाले की देशासाठी विकास महत्वाचा आहे आणि विकासासाठी शांतता आणि एकता महत्वाची आहे. तसेच पंतप्रधान मोदी खासदारांना संबोधताना म्हणाले की, मला याची जाणीव आहे की तुमच्यावर १०० कोटीपेक्षा अधिक लोकांची जबाबदारी आहे. परंतु आपल्या व्यस्त कामांमधून काही वेळ समाजसेवेसाठी दिला पाहिजे. आपण राजकारणात सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर देशाची सेवा आणि समाज सेवा करण्यासाठी आलो आहोत. तसेच मोदींनी खासदारांना सांगितले की शांततेशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. मी तर जनतेला भेटत असतो. तुम्ही देखील लोकांमध्ये जाऊन योजनेच्या माध्यमातून जोडावे.

काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला होता. तेव्हा मनमोहनसिंग म्हणाले होते की, ‘भारत माता की जय’ या घोषणेचा भारतात ‘अतिरेकी आणि निव्वळ भावनिक’ कल्पना तयार करण्यासाठी गैरवापर केला जात आहे. जवाहरलाल नेहरूंच्या कार्यावर आणि भाषणावर आधारित पुस्तकाच्या प्रारंभाच्या भाषणात मनमोहन सिंग म्हणाले की, भारताची राष्ट्रांच्या गटात उज्ज्वल लोकशाही म्हणून ओळख आहे.