डॉ. श्रीराम लागूंचे काम कायम लक्षात राहील, PM मोदींकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिग्गज अभिनेते आणि सर्जन डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 व्या वर्षी मंगळवारी (दि.17) निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर इंडस्ट्रीसहित देशातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी विविधता आणि तेजस्वीपणा काय असतो हे आपल्या अभिनयामधून दाखवून दिला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मोदींनी ट्विटवरून लागू यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे. वर्षानुवर्ष त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे काम कायम लक्षात राहील. त्यांचे निधन झाल्याचे समजल्यावर अतिशय दुख: झालं आहे. माझी सहानुभूती त्यांच्या चाहत्यांसोबत आहे. ओम शांती, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांपासून ते राजकीय नेते मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लागू यांना आदरांजली वाहिली आहे.

श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटांसह नाटकांमध्ये फार मोठे योगदान दिले आहे. सामना, सिंहासन, पिंजरा या सारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. नटसम्राट या नाटकातील त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. श्रीराम लागू यांनी 100 पेक्षा अधिक हिंदी आणि 40 पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमधून काम केले. 1978 मध्ये घरौंदा या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/