PM मोदी म्हणजे ‘ओबीसी’ समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकरच, भाजप खासदाराने उधळली स्तुतिसुमनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी लोकसभा आणि राज्यातील विधानसभेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी हे आरक्षण वाढण्याचा निर्णय 2009 मध्ये घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी, आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी दिलेले आश्वासन पाळल्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

भाजपमध्ये ओबीसी वर्गावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रश्नावर ओबीसी वर्गाला अजिबात डावललं जात नाही. तसेच भाजपचा ओबीसी वर्गातील सर्वात जास्त मतदार असल्याचे साबळे यांनी म्हटलं आहे. ओबीसी वर्गाला संविधानिक अधिकार नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यामुळे नरेंद्र मोदी म्हणजे ओबीसी समजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरच असल्याचे सांगत अमर साबळे यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

अमर साबळे पुढे म्हणाले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या वर्गाला सभागृहात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे या वर्गातील नागरिकांच्या समस्या त्यांच्या माध्यमातून मांडल्या गेल्या पाहिजेत. याच भावनेने संविधानामध्ये आरक्षणाबाबतची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीची मुदत जानेवारीमध्ये संपत असताना मोदींनी ही मुदत आणखी 10 वर्षे वाढवण्याचा निर्णय घेतला. मोदींनी घेतलेल्या निर्णयाने समाजात समाधानाचं वातावरण असल्याचे साबळे म्हणाले.

यापूर्वी युपीए सरकारने 2009 मध्ये हे आरक्षण 10 वर्षांनी वाढवले होते. याची मुदत 25 जानेवारी 2020 मध्ये संपत आहे. आज केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या आरक्षणाच्या मुदतवाढीला संमती देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता या निर्णयाला संसदेची मंजुरी मिळवण्यात येईल. संसदेने या आरक्षणाच्या मुदतवाढीला मंजुरी दिल्यास ते जानेवारी 2030 पर्य़ंत लागू होणार आहे.