जगातील पहिल्या रूपांतरित इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनचे लोकार्पण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिझेल इंजिनमधून इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रुपांतरीत केलेल्या जगातील पहिल्या रेल्वे इंजिनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे लोकार्पण केले. रेल्वे इंजिन रुपांतरीत करण्याचा जगातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगाद्वारे २,६०० हॉर्सपावरच्या दोन युनिटच्या डिझेल इंजिनचे १०,००० हॉर्सपावरच्या इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे.

डीएलडब्ल्यूचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डिझेल इंजिनमधून इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रुपांतरीत करण्याचा जगातील हा पहिलाच प्रयोग आहे. या यशस्वी प्रयोगामुळे हे नवीन रुपांतरीत इंजिन १०,००० हॉर्सपावरच्या ट्वीन इंजिनप्रमाणे काम करणार आहे. अशा प्रकारे डिझेल इंजिनचे रुपांतर इलेक्ट्रिक इंजिनमध्ये करणे ही केवळ ऐतिहासिक कामगिरी नव्हे तर खर्चातही बचत करणारी मोठी कामगिरीही ठरली आहे.’

वाराणसीतील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स (डीएलडब्ल्यू) या रेल्वेच्या कारखान्याच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. ह्या कारखान्यामध्ये डिझेल इंजिनांचे उत्पादन केले जाते. डिझेल इंजिने बनवणारा हा भारतामधील सर्वात मोठा कारखाना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या वाराणसी मतदार संघात दौऱ्यावर आहेत . या दौऱ्यात ते अनेक योजनाचा शुभारंभ करणार आहेत.