तामिळनाडूच्या अभिनंदनचा देशाला गर्व आहे : मोदी

कन्याकुमारी : वृत्तसंस्था – कन्याकुमारी येथे एका जाहीर सभेत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात विंग कमांडर अभिनंदन यांच्या कौतुकाने केली. तामिळनाडूच्या अभिनंदनचा गर्व प्रत्येक भारतीयाला आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पाकिस्तानातून अटारी सीमेवरून अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात येणार आले.

या सभेत बोलताना मोदी म्हणाले , “अनेक वर्षांपासून देश दहशतवादाचा सामना करतोय. २००४ पासून ते २०१४ पर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले. जयपूर, मुंबई, पुणे, हैदराबाद यासह अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. २६/११ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. पण उरी आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा आम्ही बदला घेतला. देशाच्या शूरवीर जवानांना मी सॅल्युट करतो”, असं मोदी म्हणाले.

कन्याकुमारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं. यानंतर मोदींची जाहीर सभा झाली. यासभेत मोदींनी आधीच्या काँग्रेस प्रणीत युपीए सरकारला लक्ष्य केलं. लष्कराला दहशतवाद्यांचा बदला घ्यायचा आहे, अशा बातम्या वृत्तपत्रातून येत होत्या. तरीही युपीए सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. मात्र, आता दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी सैन्याला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, असं मोदींनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले , काही राजकीय पक्ष माझा द्वेष करतात. आता ते देशाचाही द्वेष करू लागलेत. संपूर्ण देश आपल्या जवानांच्या आणि लष्कराच्या पाठिशी आहे. तरीही हे पक्ष लष्करावर संशय व्यक्त करत आहेत. दहशतवादाविरोधातील लढाईत जगाचाही भारताला पाठिंबा आहे. पण काही राजकीय पक्षांना दहशतवादाविरोधातील लढाईवरही संशय आहे, अशी टीका मोदींनी केली.