…म्हणून एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला, मोदींनी केला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर देशातील जनतेचा उद्रेक झाला होता. यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांना ठार केले. याचे संपूर्ण श्रेय भारतीय जवानांचे आहे. जवानांच्या शौर्याला सलाम आहे. यापूर्वी देशात अनेक पंतप्रधान झाले असतील. जर कोणताही निर्णय घेताना राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार केला असता. माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे. म्हणून मी ठरवल ज्या ठिकाणाहून दहशतवाद्यांचे रिमोट कंट्रोल चालतं तिथेच हल्ला करायचा अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, भारतीय जवानांवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशातील जवान आपल्या देशाची मान कधीच खाली पडू देणार नाहीत. जवानांच्या सामर्थ्यावर विश्वास असल्यानेच मी पूर्णपणे जवानांना स्वातंत्र्य दिले. सर्वांनाच माहित आहे दहशतवाद्यांचे मूळ कोठे आहे ? दहशतवादी मुंबईत आले अनेकांना मारलं, उरीमध्ये आले जवानांवर हल्ला केला. हे कधीपर्यंत चालणार म्हणून मी निश्चित केलं, दहशतवाद्यांचं रिमोट कंट्रोल कुठून चालतं तिथेच हल्ला करायचा. माझ्यासाठी निवडणूक महत्त्वाची नव्हती तर देशाच्या सुरक्षेला मी प्राधान्य दिलं. मात्र आपल्याच देशातील काही लोक मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानतात हे दुर्देव आहे अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.

माझ्यासारख्या राजकीय व्यक्तीला कोणताही अनुभव नसताना देशाने माझ्या हातात पूर्ण बहुमत दिलं. जगात आज जी भारताची ताकद दिसते ती एकट्या मोदींमुळे दिसतेय असं नाही, तर त्या सव्वाशे करोड जनतेने पूर्ण बहुमताने दिलेलं सरकार आहे त्यामुळे जगात भारताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.