PM नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, 17 हजार कोटी रुपये केले वितरीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील दीड वर्षात 75 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातील 22 हजार कोटी रुपये हे लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने 17 हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या.


शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर
या योजनेमुळे गावांमधील शेतकरी समूहांना, शेतकरी समित्यांना, FPO ना वेअरहाऊस बनवण्यासाठी तसेच कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी आणि फूड प्रोसेसिंगशी संबंधित लघु उद्योग सुरु करण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी योजनेचा शुभारंभ करताना म्हटले आहे. पूर्वी e-NAM द्वारे एक तंत्रज्ञान आधारित एक मोठी व्यवस्था बनवण्यात आली आहे. आता कायदा तयार करून शेतकऱ्यांना बाजाराच्या तसेच बाजार कराच्या कक्षेतून मुक्त करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांपुढे अनेक पर्याय
आता शेतकऱ्यांपुढे अनेक पर्याय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आपल्याच शेतात आपल्या पिकाची विक्री करावी असे जर शेतकऱ्याला वाटले, तर तो आता करु शकणार आहे. किंवा जे कोणी त्याला अधिक किंमत देत असेल असा e-NAM शी संबंधित व्यापारी आणि संस्थांना देखील तो आपले उत्पादन थेट विकू शकतो. या देशातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांना घाबरवण्याचे काम सर्वाधिक झाले. आता या भीती घालण्याच्या तंत्रापासून देखील व्यापाऱ्यांची सुटका होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.