मोदींकडून वन नेशन वन कार्डचं उद्घाटन.. काय आहे वन नेशन वन कार्ड ? कसा कराल वापर ?

अहमदाबाद : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये अहमदाबाद मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय एकात्मिक वाहतूक कार्ड म्हणजेच वन नेशन वन कार्ड या योजनेचं उद्घाटन केलं. आता या ‘नॅशनल कॉमन मोबेलिटी कार्ड’ (National Common Mobility Card) द्वारे प्रवाशांना बस प्रवास, टोल टॅक्स, पार्किंग शुल्क, खरेदी करता येणार आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना बँकेतून पैसेही काढता येणार आहेत.

सदर नॅशनल काॅमन मोबेलिटी कार्ड हे रूपे कार्ड असणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान जगात सिंगापूर आणि लंडनसारख्या अवघ्या काही देशांमध्येच आहे. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. ग्राहकांना आपल्या बँकेकडूनच हे कार्ड दिले जाणार आहे. याचा फायदा असा की, या कार्डाद्वारे मेट्रो, बस, उपनगरी रेल्वे, टोल, पार्किंग, मॉलमध्ये खरेदी अशा कोणत्याही स्वरूपाचे पैसे भरता येणार आहेत.

काय आहे ‘वन नेशन वन कार्ड’चा उपयोग आणि वापर ?

– ग्राहकांना आपल्या बँकेकडून देण्यात आलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये एक खास फीचर जोडलं जाणार आहे. नॅशनल काॅमन मोबेलिटी कार्ड असं या फीचरचं नाव आहे. याचा वापर ग्राहक एखाद्या वाॅलेटसारखा करू शकणार आहेत.

– या नवीन फीचरसाठी ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टम तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. व्यापक स्तरावर काम करून हे कार्ड विकसित करण्यात आलं आहे. पूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या सिस्टीममुळे देशात इंटिग्रेडेट व्यवस्था विकसित होत नव्हती. याचा परिणाम असा होत होता की, एखादं कार्ड दुसऱ्या शहरात कामी येत नव्हतं.

– या कार्डच्या आगळ्या वेगळ्या फीचरमुळे हे कार्ड तिकीट काऊंटरवर असणाऱ्या पीआेएस मशीनवर वापरता येणार आहे.

– या कार्डचा विशेष फायदा म्हणजे मेट्रो रेल्वेसाठी स्मार्ट कार्ड म्हणूनही या कार्डचा वापर केला जाणार आहे.