15 ऑगस्टला PM मोदी देशवासीयांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा करुन देशातील नागरिकांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी सांगितल्यानुसार, या प्रस्तावाला कॅबिनेट मिटिंग मध्ये प्राथमिक स्वरुपात मंजुरी देण्यात आली आहे. एनडीएचएम या सुविधेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाचं वैयक्तिक आरोग्य पत्रक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाची आरोग्याची माहिती डिजिटल स्वरुपात नोंद केली जाईल. त्यात डॉक्टर आणि आरोग्य सुविधांचीही नोंद असेल.

एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील कोणतीही व्यक्ती एनडीएचएम या मिशनसाठी नोंदणी करु शकेल. या मिशनमध्ये चार महत्वाची वैशिष्ट्ये असतील. हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्डस्, डीजी रेकॉर्डस्, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ही या योजनेची चार प्रमुख वैशिष्ट्ये असू शकतात. योजनेमध्ये ई फार्मसी आणि टेलिमेडिसीन सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याकरता वेगळे नियम बनवण्यात आले आहे.

देशातील कोणत्याही नागरिकाला नोंदणी करणे बंधनकारक नसेल. संबंधित नागरिकाने दिलेल्या परवानगी नंतर त्याच्या आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करण्यात येईल. तसेच डॉक्टर अथवा रुग्णालयांना या योजनेंतर्गत माहिती नोंदवणं बंधनकारक नसेल. योजनेसाठीचा सहभाग पूर्णरीत्या ऐच्छिक स्वरुपाचा असेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी इंधू भूषण यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन लागू झाल्यानंतर आरोग्य सेवेतील पारदर्शकता, त्यांची क्षमता वाढेल.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवताना चार प्रमुख लक्ष ठेवून ती राबवण्यात येईल. डिजिटल आरोग्य यंत्रणा तयार करुन तपशिलाची नोंद करणं, आरोग्याशी संबंधित माहितीचा प्रसार वाढवणं, ती माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल असा प्लॅटफॉर्म तयार करणं, संपूर्ण देशातील आरोग्याची माहिती असलेली रजिस्ट्री उपलब्ध करुन देणं. या उद्देशानं नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार असल्याचं, इंधू भूषण म्हणाले.