भारत-चीन तणाव वाढल्यामुळ पंतप्रधानांनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक

पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाचा कहर सुरु असताना दुसर्‍या बाजूने चीन कुरघोडी करीत आहे. त्यामुळे तणाव वाढला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत हजर होते. याआधी परराष्ट् सचिवांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.भारत आणि चीनमधील सैन्यांमध्ये सिक्कीम आणि लडाखमध्ये तणाव वाढला असतानाच ही बैठक बोलावण्यात आली होती.

लडाखजवळ चीनकडून हवाई तळाचे काम सुरु असून सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये चीनने हवाईतळावर लढाऊ विमानेही तैनात केले असल्याचे दिसत आहे. यादरम्यान चीनने दुतावासाला नोटीस पाठवून भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे.

सॅटेलाइट फोटोंमध्ये तिबेटमधील नगरी गुनसा विमानतळावर मोठ्या प्रमाणात चीनकडून बांधकाम सुरु आहे. एका महिन्याच्या अंतराने काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये चीन हेलिकॉप्टर किंवा लढाऊ विमानांसाठी धावपट्टी तयार करत असून शेवटचा फोटो 20 मे रोजी घेण्यात आला आहे. तिसर्‍या फोटोत धावपट्टीवर चार लढाऊ विमाने उभी असल्याचे दिसत आहे.

भारताने लडाखमधील गालवान व्हॅली येथे बांधकाम सुरु केल्यानंतर तणाव वाढण्यास सुरुवात झाली. चीनने गालवान व्हॅली येथे रस्ता आणि पूलाचे बांधकाम करण्यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. स्थानिकांच्या मदतीने हे बांधकाम सुरु असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले होते.