मोदींच्या ‘फॅन’साठी खुशखबर ! ‘या’ तारखेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट होणार रिलीज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक वादविवादांमध्ये अडकलेल्या पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून २४ मे २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच अनेक वादांमुळे चर्चेत आहे. निवडणुकीचे उल्लंघन होत असल्यामुळे या चित्रपटावर आक्षेप घेत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वी दोनदा बदलण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घेतली होती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्‍या काळात या चित्रपटावर बंदी घातल्‍यानंतर निर्मात्‍यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट पाहा, त्यानंतर निर्णय द्या, असे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. तसेच त्याचा अभिप्राय बंद लिफाफ्यात २२ एप्रिलपर्यंत कळवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होते.

त्यानंतर निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे १९ मेपर्यंत न करण्याचे आदेश दिले. याविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली पण त्यांना सुप्रीम कोर्टातूनही दिलासा मिळू शकला नाही. अखेर शुक्रवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘यू’ सर्टिफिकेट दिल आहे. हा चित्रपट १३० मिनिटं (दोन तास दहा मिनिटं ५३ सेकंद) चा आहे. २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा ‘पीएम नरेंद्र मोदी’ पहिला चित्रपट ठरणार आहे.