‘त्या’ प्रकरणी निवडणूक आयोगाकडून मोदींना दिलासा ; विरोधकांना चपराक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने ‘मिशन शक्ती’च्या विषयी दिलेल्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे सांगत क्लीन चिट दिली आहे. अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी भारताने बुधवारी घेतली. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाहिनीवरुन देशाला संबोधित करताना मिशन शक्तीची माहिती दिली. मोदींच्या घोषणेने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

निवडणूक आयोगाने मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणाची दखल घेतली असून अधिकाऱ्यांच्या समितीला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. मोदींच्या भाषणासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी उप निवडणूक आयुक्त डॉ. संदीप सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप –

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या ‘मिशन शक्ती’ या भारताच्या यशस्वी मोहीमेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे देशाला दिली. निवडणूक आचारसंहिता असताना मोदींनी केलेल्या या भाषणावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. तसंच निवडणुकीच्या काळात त्यांनी भाषण केले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे असा आरोप करत माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित लेखी तक्रार केली होती.