PM नरेंद्र मोदींची पुतणी सोनल अहमदाबादमधून भाजपकडून निवडणूकीच्या रिंगणात ?

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून सोनल मोदी यांना तिकीट दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सोनल मोदी या पंतप्रधान मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची कन्या आहेत. ४० वर्षीय सोनल मोदी या गृहिणी असून, त्या अहमदाबादच्या जोधपूर येथे राहतात. त्यांनी अहमदाबाद निवडणुकीसाठी बोडकदेव प्रभागातून भाजपकडे तिकीटाची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. तथापि, सोनल मोदी यांना भाजप तिकीट देते का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.

याबद्दल बोलताना सोनम मोदी यांचे वडील प्रल्हाद मोदी म्हणाले, “माझी मुलगी लोकशाहीप्रधान देशाची नागरिक आहे. तिला स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र असून, तिचे काका देशाचे पंतप्रधान आहे. त्यामुळं निवडणुकीत मदत होईल नरेंद्रभाई यांना पक्षात मोठा मान आहे. तो मान माझ्या मुलीलाही मिळेल असा विश्वास आहे. निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेत माझी मुलगी बसत असेल तर तिला नक्की तिकीट मिळेल,” असेही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, गुजरातमधील स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचा निकाल २३ फेब्रुवारी तर दुसऱ्या टप्प्याचा निकाल २ मार्चला जाहीर होईल.