नवे शिक्षण धोरण भारताच्या पायाभरणीसाठी उपयुक्त : PM नरेंद्र मोदी

पोलिसनामा ऑनलाईन – भारताच्या पायाभरणीसाठी नवे शिक्षण धोरण उपयुक्त असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक देश आपले ध्येय बदल करत पुढे जात असतो. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामागे हाच विचार असल्याचेही मोदींनी सांगितले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला ते संबोधित करत होते.

देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक मत मांडत आहे. शिक्षण धोरणावर मंथन करत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे. देशातील कोणत्याही क्षेत्र, वर्गाकडून यामध्ये एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. लोक वर्षांपासून सुरु असलेल्या शिक्षण धोरणात बदल अपेक्षित करत होते आणि तो पहायला मिळत आहे. इतका बदल कागदावर केला पण प्रत्यक्षात कसा आणणार असेही अनेकजण म्हणत असतील. या धोरणाची अमलबजावणी कशी केली जाणार याकडे सर्वांच लक्ष आहे. जे बदल करावे लागतील ते सर्वांनी मिळून करावे लागतील. जिथवर राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे तर मी पूर्णपणे कटिबद्द आणि तुमच्यासोबत आहे. भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी, विकासाची नवी उंची गाठण्यासाठी, नागरिकांना अजून सशक्त करण्यासाठी, जास्तीत जास्त संधी देण्यासाठी या धोरणात विशेष लक्ष देण्यात आले आहे, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.