पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचे कौतुक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या विधानसभा निवडणूका तोंडावर असताना वेगवेगळ्या पक्षांचे दिगज्ज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी औरंगाबादकडे प्रस्थान केले. येथे एका भाषणाची सुरवात त्यांनी मराठीमधून केली. सुरवातीलाच पंतप्रधानांनी गौरीगणपतीच्या मराठीतून शुभेच्छा देऊन उपस्थितांची दाद मिळवली.

औरंगाबाद येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांच्या भाषणाच्या अगोदर मुंडे यांनी राज्यभरातल्या बचत गटांच्या कामांचा आढावा उपस्थितांसमोर ठेवला.

देवेंद्र फडणवीस एक यशस्वी मुख्यमंत्री
राज्यात बचत गटांचा मोठा विस्तार झाला आहे. तब्बल ४ लाख ५ हजार बचत गट राज्यात कार्यरत आहेत. मागच्या काळात बचत गटांचा मोठा विस्तार झाला आहे. यामुळे राज्यातील महिलांना विदेशात जाण्याची सुद्धा संधी मिळाली. पंकजा मुंडे यांनी भाषणात सांगितले की, महिलांच्या कौशल्य विकासावर शासनाने भर दिल्यामुळे महिला आता मोठ्या प्रमाणावर स्वयंपूर्ण झाल्या आहेत. तसेच प्रधानमंत्री मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगलेच कौतुक केले. प्रधानमंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते विविध मेट्रो मार्गांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (७ सप्टेंबर) रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन केले. तसेच त्यांच्या हस्ते मेट्रो भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचं जाळं ४२ किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक हा मेट्रो १० वरील ९. २ किलोमीटर मार्ग, मेट्रो ११ वरील वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो १२ वरील कल्याण ते तळोजापर्यंत २०.७ किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे. तसेच कांदिवलीतील बाणडोंगरी मेट्रो स्थानक आणि मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मेट्रो कोचचंही पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलं.

एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचे उद्घाटन केले जात आहे. या कामांचा निवडणुकीत कोणाला किती फायदा मिळतो हे निवडणुकांच्या निकालावरूनच स्पष्ट होईल.