सोनिया गांधींच्या मतदारसंघात मोदींनी उधळली कोटींची खैरात 

रायबरेली : उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी आज (रविवारी) उत्तर प्रदेश दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी रायबरेली या सोनिया गांधी यांच्या मतदार संघात कोटींची खैरात उधळून येथील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी रायबरेलीत येऊन तब्ब्ल ११०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन, कोनशिला आणि लोकार्पण केले आहे. रायबरेली मतदार संघात रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्याचा मोदींनी प्रयत्न केला असून त्यांनी येथे विकास कामे करून आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी यांच्यासाठी कठीण करण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्र सरकारच्या वतीने बनवण्यात आलेल्या रेल्वे कोच फैक्ट्रीला मोदींनी आज भेट दिली असून त्यांनी रेल्वेचे डबे बनवण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. कालच या ठिकाणी मोदींच्या दौऱ्याच्या तयारी निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिली होती. त्यांनी त्यावेळी पत्रकारांशी साधलेल्या संवादात ते म्हणाले होते कि, रेल्वे कोच फैक्ट्री मध्ये ५०० रेल्वे कोच बनवण्याचे काम सध्या सुरु आहे. येत्या काळात या रेल्वे कोच फैक्ट्रीचा विकास होऊन या ठिकाणी ५००० कोच बनवण्याची क्षमता विकसित करायची आहे असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा यासाठी हि महत्वाचा मानला जातो आहे कि भविष्यत भारत रेल्वे कोच बनवण्याच्या क्षमतेत वृद्धी करून रेल्वे कोच निर्यातीचे आपले स्वप्न पूर्ण करेल. नरेंद्र मोदी रायबरेलीतील कार्यक्रम आटपून प्रयागराजकडे प्रस्थान ठेवणार आहेत. तेथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

केंद्र सरकारच्या सैभाग्य योजने अंतर्गत लोकांना घरोघर वीज पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारने रायबरेलीत उभारलेल्या रेल्वे कोच फैक्ट्रीमुळे येथील युवकांच्या हाताला काम मिळवून दिले गेले आहे म्हणून येथील बेरोजगार युवक आता या फैक्ट्रीच्या माध्यमातून सक्षम बनत चालला आहे. लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितलेला मेक इन इंडियाचा प्रयोग साक्षात सत्यात उतरताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

सोनिया गांधी खासदार असलेल्या मतदारसंघात मोदींनी कामाचा सपाटा लावला आहे. तर याच मतदारसंघातून आप नेते डॉ. कुमार विश्वास यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरवण्याचा भाजपचा डाव असून माजी  काँग्रेस अध्यक्षा यांच्या पराभवाचा पाया विकासाच्या माध्यमातून रचण्याचा घाट भाजपने घातला आहे. रायबरेली येथील लोक हि भाजपच्या कामांवर खुश असून काँग्रेसच्या सत्तेच्या काळात या बालेकिल्ल्यात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी भाजपच्या सत्तेच्या काळात झाली आहेत असे येथील लोक सांगतात.